राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या आत्मविश्वासाचे, आत्मभानाचे, आत्मतेजाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आपला तिरंगा ध्वज घरावर फडकवावा आणि देशाविषयीची अभिमानाची भावना मनात सतत तेवत ठेवावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित युवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, शिवेंद्रराजे भोसले,सुनील कांबळे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, आयोजन समिती अध्यक्ष डॉ.राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पुणे विद्यापीठाचे उपक्रमाबाबत अभिनंदन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठल्याही देशातील राष्ट्रभक्त तरुणांनी मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकविण्याचा हा अनोखा विक्रम असेल. हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. या उपक्रमासोबत स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनामिक स्वातंत्र्य सैनिकांना शोधून नव्या पिढीपुढे आणण्याची आवश्यकता आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढी होती, स्वातंत्र्यानंतर देशाला स्वयंपूर्ण करण्याचे ध्येय समोर असलेली पिढी होती, तर आज देशाला विश्वगुरू पदापर्यंत पोहोचविण्याची क्षमता असलेली पिढी देशाला पुढे नेत आहे. संशोधन, नाविन्यता आणि उद्यमशीलतेच्या बळावर या पिढीने जगाला चकित केले आहे. जागतिक स्तरावर देशाला विकासाकडे घेऊन जाताना त्यांची नाळ राष्ट्राशी जोडण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचे हे एक माध्यम आहे. या माध्यमातून ज्ञानाधारीत समाजव्यवस्था निर्माण करायची आहे. केवळ शिक्षित समाज निर्माण करून उपयोगाचे नाही तर विद्यार्थ्याची वाटचाल ज्ञानाकडे व्हायला हवी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्व घडायला हवे. राष्ट्र घडविण्यासाठी समाजाविषयी जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण करणारी व्यवस्था अनुकूल परिवर्तन घडवू शकते. अशा उपक्रमाच्या माध्यमातून युवा पिढीला समाजाशी जोडत असल्याने त्याला महत्व आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Share