अनिल परबांनी आता बॅग भरावी; तुरूंगाची हवा खाण्यासाठी त्यांनी तयार रहावे

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल केला असून, परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ‘ईडी’ने आज गुरुवारी सकाळी छापे टाकले आहेत. ‘ईडी’च्या या मोठ्या कारवाईनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परबांनी कपड्याची बॅग तयार ठेवावी. अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा दिला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून, ‘ईडी’ने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि दापोली परिसरात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘ईडी’ने आज सकाळी अनिल परब यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात सात ठिकाणांवर छापा मारून झाडाझडती सुरू केली आहे.

दरम्यान, सक्तवसुली संचलनालयाकडून अनिल परब यांच्यावर छापेमारीची कारवाई सुरू होताच किरीट सोमय्यांनी व्हिडीओ ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले, बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि ‘फेमा’ कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ‘ईडी’ने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता अनिल परब यांची तुरूंगात जाण्याची वेळ आली आहे. परब यांचे सर्व काळे कारनामे आता बाहेर येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. खार पोलिसांकडे माझ्याविरुद्ध तक्रार परबांनी दिली. वांद्रे पोलिस ठाण्यात बोगस एफआयआर त्यांनीच दिली.

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेने अनिल परब यांचे नाव घेतले होते. पोलिस बदल्यांमध्ये त्यांचे नाव आले होते. त्याआधी एका प्रकरणात ‘ईडी’ चौकशी करत होती. तसेच लॉकडाऊन असताना अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधले. या प्रकरणी मी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. अनिल परब यांनी शेकडो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. अनिल परब आणि संजय कदम यांचे संबंध आहेत. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले. या सगळ्याचे आता कारवाईमध्ये रुपांतर झाले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या म्हणाले की, फौजदारी खटला भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. परब यांच्यावरोधात उद्धव ठाकरे सरकारनेच गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच परबांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी म्हणतो की, ठाकरे कुटुंब माफिया आहे. सगळ्यात पहिली माहिती ठाकरे कुटुंबाला कळते. कारण, ते घोटाळे करतात.

मुंबई मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणात दुबई संबंधांची ‘ईडी’ने चौकशी केली आहे. हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांचीही चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

Share