वाईन विक्री विरोधातील अण्णा हजारेंचे उपोषण मागे

राळेगणसिद्धी :  राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र सरकारने हजारे यांनी उपोषण न करण्याची विनंती केली आहे. तसेच अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. या ग्रामसभेत अण्णा हजारे यांनी नियोजित उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात दारू कमी आहे? बीयर बारचे दुकाने आहेत ना. परमिट रुमही आहेत. वाईन शॉपीचे दुकानेही आहेत. त्यात वाईन मिळते ना? तुम्ही परत दुकानात का ठेवता? सुपर मार्केटमध्ये का ठेवता? एवढी दुकाने असताना आणखी का ठेवता? सर्व लोकांना व्यसानाधिन करायचे आहे का? लोक व्यसनाधीन झाले की आपल्याला जे साधायचे ते साधून घ्यायचे असा काही डाव आहे का? अरे व्यसानाने बरबाद झाले ना लोक. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही बालके आमची संपत्ती आहे. ही बालके व्यसनाधीन झाली तर काय होणार?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला.

तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. सरकारने आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेऊन जनतेवर लादू नयेत, तसे झाले तर ग्रामसभा आंदोलन करतील. केवळ राळेगणसिद्धी नव्हे, राज्यातील सर्व गावात असे निर्णय घ्या. सरकारने यापुढे प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असा निर्णय राळेगणसिद्धी ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच पुढील तीन महिन्यात वाईनसंबंधी जनमत जाणून घ्या, लोक नको म्हणाले तर निर्णय रद्द करा,’ असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Share