ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

औरंगाबाद : राज्याचे रोहियो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भुमरे यांच्या मुलाने शासकीय जमिनीवर घरकुल योजनेसाठी बेकायदा भूखंड लाटत ३० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले असल्याचा दावा गोर्डे यांनी केला.

मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे यांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून तसेच आपल्या पदाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांची शासकीय जमीन लाटली आहे. याबाबत आपण औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक, लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. तसेच पोलिस अधिक्षक पैठण उपविभाग व पोलिस स्टेशन पैठण यांच्याकडे यापूर्वी तक्रारी अर्ज दाखल केला होता. परंतु माझ्या तक्रारी अर्जांची कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी याचिका क्र.१०६२/२०२१ दाखल केली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय, पैठण पोलिस उपविभाग कार्यालय व पोलिस स्टेशन पैठण कार्यालयात तक्रार दाखल असल्याचे गोर्डे यांनी म्हटले.

Share