ठाकरे कुटुंबाचा आणखी एक घोटाळा उद्या उघड करणार : किरीट सोमय्या

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा तसेच महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा उद्या (दि.१५) आपण उघडकीस आणणार आहोत, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच मध्यंतरी मी ‘नॉट रिचेबल’ का झालो होतो, याचे उत्तरही आपण देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

‘आयएनएस विक्रांत’ निधी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा ‘अॅक्शन मोड’ मध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.  सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा टीकास्त्र सोडले.  मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याची मालमत्ता जप्त झाली, त्यानंतरही उद्धव ठाकरे गप्प का ? असा सवाल करून, उद्धव साहेब, उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी यावेळी दिला. घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणे हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची यादी जाहीर केली होती. किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यामुळेच यशवंत जाधव, प्रताप सरनाईक आणि श्रीधर पाटणकर हे अडचणीत आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी या तिघांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यानंतर पुढचा नंबर हा हसन मुश्रीफ यांचा असेल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविषयी नवा खुलासा करण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले होते. त्यामुळे आता उद्या किरीट सोमय्या महाविकास आघाडीचा कोणता नवा घोटाळा बाहेर काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही : सोमय्या
किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र,  सोमय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. ही सगळी शिवसेनेची स्टंटबाजी असून, ही स्टंटबाजी करून संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरून घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

‘विक्रांत’साठी पैसे गोळा करण्याची मोहीम प्रतिकात्मक
‘आयएनएस विक्रांत’साठी पैसे गोळा करण्याची मोहीम प्रतिकात्मक होती, असे स्पष्ट करून किरीट सोमय्या म्हणाले, १९९७-९८ पासून ‘विक्रांत’ची मोहीम सुरू झाली. ;विक्रांत’चा कार्यक्रम प्रतिकात्मक होता. ‘विक्रांत’ युद्धनौका वाचवण्यासाठी शिवसेनेने समर्थन दिले होते. संजय राऊत यांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला ‘सेटिंग’ म्हणतात, असा आरोप सोमय्या यांनी केला.

Share