मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ५० वा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला होता. करण जोहरने त्याच्या वाढदिवसानिमित्त यशराज फिल्म स्टुडिओमध्ये जंगी पार्टी दिली होती. मात्र, करणच्या वाढदिवसाचे हे जंगी सेलिब्रेशन कोरोनाचा सुपर स्प्रेडर इव्हेंट ठरले आहे. करण जोहरच्या पार्टीतील तब्बल ५५ बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षीदेखील करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीमध्ये अभिनेत्री करिना कपूर-खान, मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा यांना कोरोना झाला होता. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाईचे आदेशही दिले होते. आताही करणची पार्टी बॉलिवू़डच्या सेलिब्रेटींसाठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. नुकताच करण जोहरने त्याचा ५० वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त करणने आयोजित केलेल्या बर्थ डे पार्टीमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अभिनेता शाहरुख खान, विकी कौशल, ऋतिक रोशन, अभिनेत्री कतरिना कैफ, करिना कपूर-खान, कियारा आडवाणी, जान्हवी कपूर, पूजा हेगडे, सबा आझाद यांच्यासह बॉलिवूड तसेच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते.
या पार्टीनंतर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. करण जोहरच्या पार्टीला गेलेल्यांपैकी तब्बल ५५ सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, करण जोहरच्या जवळच्या बऱ्याच मित्रांना या पार्टीनंतर कोरोनाचे संक्रमण झाले आहे. बरेच जण आपले नाव जाहीर केल्यास सोशल मीडियावर बदनामी होईल या भीतीने कोरोना झाल्याचे सांगण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.
https://www.instagram.com/tv/CeGacqfo2GL/?utm_source=ig_web_copy_link
काल प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कार्तिक आर्यन करण जोहरच्या पार्टीला गेला नव्हता. मात्र, अभिनेत्री कियारा अडवाणी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे कार्तिकला तिच्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. करणच्या बर्थ डे पार्टीमध्ये सहभागी झाल्यानंतर कियाराने कार्तिकसोबत त्यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. मात्र, कियाराबाबत अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही किंवा कियाराने यावर कोणतीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारलादेखील कोरोनाची लागण झाली असून, त्याने स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. याशिवाय अभिनेता आदित्य रॉय कपूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे.