राजभवनावर चहा-बिस्कीट न घेता जाब विचारून दाखवा? राऊतांचं शेलारांना चॅलेंज

मुंबई : ‘कर्नाटकच्या आरे ला कारे करण्यापेक्षा आधी राजभवनावर जा. तिथे घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कटं न खाता त्यांना शिवरायांचा अपमान का करता हे विचारा’, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबई माध्यामांशी बोलत होते.

छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झालाय हे तरी मान्य आहे का?
रोज उठताहेत आणि शिवरायांची बदनामी करताहेत. रोज उठताहेत छत्रपतींचा इतिहास तुडवताहेत. अख्ख्या जगाला माहितीये की, छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला. महाराष्ट्रातील लहान लेकरं सांगतील की, शिवनेरीवर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. काल भाजपने शोध लावला की शिवनेरी नाही. शिवनेरी इतिहासातून काढून टाकलं या लोकांनी. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झालाय हे तरी मान्य आहे का आपल्याला? छत्रपती जन्माला आले होते, हे तरी आपण स्वीकारताय का?, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.

बोम्मईना शिव्या घालाव्यात 
दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र नियोजित बेळगाव दौरा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून रोखण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले होते. त्यानंतर आता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला असे म्हटले आहे.

कबड्डी नावाचा खेळ महाराष्ट्रात आहे. त्याला एक टच लाईन असते. या दोन मंत्र्यांनी किमान सीमारेषेला टच तरी करून यावं. बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा, पण तिकडे सीमेवर जा तरी. यांच्यात हिंमत नाही. हे हतबल, लाचार लोक आहेत. हे काहीही करू शकत नाही. हे फक्त बोलतात. आम्हाला शिव्या घालतात. त्यांनी बोम्मईंना शिव्या घालाव्यात. बोंबलावं त्यांच्या नावाने. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात. घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला सुरक्षा आहे. त्यांनी जायला पाहिजे. घुसायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.

Share