पुण्यात मनसेला गळती…तब्बल ४०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची पदावरुन हकालपट्टी केली. याबाबतची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली आहे. त्यानंतर निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. माझिरे यांच्यासह जवळपास ४०० कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

खरं तर काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी मनसे सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निलेश माझिरे हे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक आहेत. वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा वारंवार डोकं वर काढत असते. याच पार्श्वभूमीवर निलेश माझिरे यांची आधी पदावरुन हकालपट्टी, आणि आता सोडचिठ्ठी या महत्त्वपूर्ण घटना मानल्या जात आहेत.

Share