‘सिल्व्हर ओक’ वर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात ज्या एसटी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना सेवेत न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही घोषणा केली आहे.
पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नसली तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एकीकडे संप सुरु असताना काही एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी अचानक आक्रमक होत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर हल्ला केला होता. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत पवारांच्या घरावर दगड आणि चपला भिरकावलया होत्या. या हल्लेखोर आंदोलक कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना तसेच इतर १०९ जणांना अटक केली असून सदावर्ते यांना न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने येत्या २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश एसटी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यातच शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला व आक्रमक आंदोलन सध्या राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. या हिंसक आंदोलनाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत.
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी येत्या २२ तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २२ एप्रिलपर्यंत जे कामगार रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. २२ एप्रिलपर्यंत संपकरी एसटी कामगार कामावर आले नाहीत तर एसटी महामंडळात कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरती सुरु केली जाईल. तसेच एसटीचे खासगीकरण करता येईल का याचाही विचार केला जाईल, असे परब म्हणाले. मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्यातील सर्व आगारांनी पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.

Share