मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीने शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून विधिमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना व्हीप जारी केला असताना आता एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून, शिंदे यांचा गटदेखील उद्धव ठाकरे यांच्या गटाला भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत विधानसभेत उद्धव ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत नाराज ३९ शिवसेना आमदार आणि ११ अपक्ष आमदारांना सोबत घेत बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि त्यानंतर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपने आता महाविकास आघाडीला दुसरा झटका देत विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर यांची लढत शिवसेनेचे राजन साळवी यांच्याशी होणार आहे.
शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीची चुरस वाढवली आहे. साळवी यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांनादेखील व्हीप जारी केला आहे. एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. शिंदे यांचा गटदेखील उद्धव ठाकरेंच्या गटाला भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीपमध्ये काय म्हटले?
दरम्यान, उद्या रविवारी होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी मतदान करण्याचे आदेश प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिले आहेत. प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीपमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवार, दिनांक ३ जुलै २०२२ आणि सोमवार, दिनांक ४ जुलै २०२२ रोजी विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. रविवारी, ३ जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेना पक्षातर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे.