मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई पोलिसांकडून अॅड. जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर जाऊन आक्रमक आंदोलन केले होते. हिंसक जमावाने गेटमधून आत घुसत दगडफेक आणि चप्पलफेक केली. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी एसटी कामगारांची बाजू कोर्टात मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अन्य १०९ जणांना त्याच दिवशी अटक केली होती.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे ९ एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडले आहे. जयश्री पाटील या मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अॅड. जयश्री पाटील यांचे पती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोर्टात गेल्या तेव्हा त्या पोलिस संरक्षणाशिवाय होत्या. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर आता अॅड. जयश्री पाटील यासुद्धा अडचणीत आल्या आहेत. जयश्री पाटील यांनीच एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यास सांगितले होते, अशी धक्कादायक बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. याच प्रकरणात गावदेवी पोलिसांनी बुधवारी (१३ एप्रिल) संध्याकाळी एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट केले आहे. त्यानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून त्या ‘नॉटरिचेबल’ आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.