मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवर प्रभू श्रीरामांचा एकेरी उल्लेख;भाजप नेते संतप्त

कोल्हापूर : राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून वाद सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये ग्रामविकासमंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या पोस्टरवरून नवा वाद सुरू झाला आहे. या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांच्या नावासोबत प्रभू श्री रामांचे नाव जोडून एकेरी उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, राजकारण तापले आहे. कागलचे भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी या पोस्टरवर तीव्र आक्षेप घेतला असून, बहुजन समाजाचे नायक प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी आज शुक्रवारी कागल येथे मिरवणूक काढून मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे घाटगे यांनी जाहीर केले आहे.

१० एप्रिल रोजी देशभरात रामनवमी साजरी करण्यात आली. याच दिवशी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवसदेखील होता. यानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून तसेच वर्तमानपत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून मुश्रीफ यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एका जाहिरातीमध्ये मात्र हसन मुश्रीफ यांच्या नावासोबत प्रभू श्रीराम यांचे नाव जोडण्यात आले होते व रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झाला. तो अत्यंत निंदनीय असून, बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असल्याची प्रतिक्रिया समरजीतसिंह घाटगे यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/ghatge_raje/status/1514500297443315713?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514500297443315713%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fpaschim-maharashtra%2Fkolhapur%2Fhasan-mushrif-birthday-samarjeetsinh-ghatge-complaints-against-advertise-of-ramnavami-sbk97

प्रभू श्रीराम यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल घाटगे यांचा आक्षेप

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या जाहिरातीला राम नवमीची डिझाईन करण्यात आली असल्याने भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारे ‘राम’ या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता, तुम्ही रामापेक्षा मोठे आहात का, असा सवालही त्यांनी केला आहे. यासंदर्भात घाटगे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका करत याप्रकरणी मुश्रीफ हे माफी मागतील म्हणून दोन दिवस वाट पाहून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. १० एप्रिल रोजी अखंड भारताचे व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मदिवस आपण साजरा केला; पण या शुभदिवसाचा हसन मुश्रीफ यांनी अवमान केल्याचा आपल्याला प्रचंड राग व खंत आहे. यातच कागलचे नाव त्यांच्या आधी घेतल्याबद्दल आपण सर्वांची माफी मागतो, असेही घाटगे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. १९५४ साली रामनवमी दिवशी तिथीप्रमाणे आपला जन्म झाल्याचे मुश्रीफ म्हणतात. तो झाला की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या स्वयंघोषित तिथीप्रमाणे रामनवमी निमित्ताने त्यांची दिलेली जाहिरात ही लाजीरवाणी बाब असल्याचे घाटगे म्हणाले.

हसन मुश्रीफांवर गुन्हा दाखल करणार : समरजितसिंह घाटगे
हसन मुश्रीफ या नावात ‘स’च्या जागी ‘रा’ व ‘मु’च्या जागी ‘म’ लिहून नवमी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याखाली ‘नवमी’ असे लिहिले आहे. ‘राम’ हा एकेरी उल्लेख कसा करता? प्रभू श्री रामचंद्र म्हणा, जय श्रीराम म्हणा, श्रीराम म्हणा. एकेरी उल्लेख करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एवढे तुमचे धाडस वाढले की, प्रभू श्रीराम यांचा एकेरी उलेख करता? तुम्ही एवढे मोठे कधी झाला? तुमची आणि प्रभू श्री रामचंद्रांची नवमी एक करायचा प्रयत्न करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. तुम्हाला आत्मचिंतन करता येत नाही का? असा सवाल घाटगे यांनी विचारला आहे.
आपण दोन दिवस वाट पाहिली. एखाद्या वेळेस चुकून झाले, असे वाटून तुम्ही माफी मागाल; पण मुश्रीफ यांनी माफी मागितली नाही. माफी मागण्याचे आवाहन करत नाही, कारण तुम्ही पूर्ण भारताचा व बहुजन समाजाचा अपमान केला आहे. त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचविली आहे. येत्या काळात बहुजन समाज तुम्हाला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये आपला वाटा हा सिंहाचा असेल, असे सांगून घाटगे यांनी शाहू छत्रपतींच्या जनक घराण्याचा रक्ताचा वंशज म्हणून मी स्वतः कागल पोलिस स्टेशनमध्ये मुश्रीफ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणतात…
दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील या प्रकरणावर प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या ५० वर्षांपासून मी रामनवमीला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्ते पोस्टर, वर्तमानपत्रातून मला शुभेच्छा देतात. आता ज्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. ते पोस्टर तर मी बघितलेलेही नाही. त्या पोस्टरशी माझा काही संबंध नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तसेच हे पोस्टर कदाचित चुकीचे असेलही; मात्र उगीचच हे प्रकरण वाढवून समाजाचे ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Share