‘सिल्व्हर ओक’ वर हल्ला : गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गिरगाव न्यायालयाने २६ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा सदावर्ते यांचा ताबा घेत पुन्हा मुंबईत आणले आणि आज गिरगाव येथील न्यायालयात हजर केले. सदावर्ते यांनी सुनावणीवेळी गिरगाव न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. युक्तिवाद करताना सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. दुसऱ्या एका गुन्ह्यात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मी अर्ज केला आहे म्हणून पोलिस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. मी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे मान्य करतो; पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलिस कोठडीची काय गरज? पोलिस पहिल्या दिवशी माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी सगळी तपासणी केली आहे. माझ्या घरी फक्त १३ वर्षांची मुलगी आहे आणि तीदेखील पोलिसांना सहकार्य करत आहे, असे यावेळी सदावर्ते म्हणाले.

 सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे जप्त
गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीची मागणी करताना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पुन्हा एकदा धक्कादायक दावा केला आहे. ‘मी एकाही कर्मचाऱ्याकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही, असे सदावर्ते याआधी वारंवार सांगायचे, मात्र आता त्यांनी पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. सदावर्ते यांनी परळ आणि भायखळ्याची मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची आहे,’ असा युक्तिवाद प्रदीप घरत यांनी न्यायालयात केला. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गिरगाव कोर्टाने अखेर गावदेवी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा मिळावा म्हणून कोल्हापूर पोलिसांनी त्वरित गिरगाव न्यायालयात अर्ज केला आहे.

Share