माजी कृषिमंत्री अनिल बोंडेवर गुन्हा दाखल

अमरावती : जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे नेते हरिभाऊ मोहोळ यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलिसांनी डॉ. बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना अचलपूर घटनेच्या त्या मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी जातीय तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे दुल्हा गेट परिसरात रविवारी झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. दगडफेकही झाली होती व तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अचलपूर व परतवाडा येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून काल अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती. यावेळी माजी कृषिमंत्री व भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांनी या दंगलीमागे मास्टरमाईंड अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. काल युवक काँग्रेसकडून बोंडे यांचा पुतळाही जाळण्यात आला होता. यानंतर काँग्रेसचे नेते हरिभाऊ मोहोळ यांनी पोलिसांत तक्रार देऊन बोंडे यांचे विधान जातीय तेढ निर्माण करणार असून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ ‘अ’ अंतर्गत बोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share