मनपाने थकवला अकृषीक कर, जिल्हाधिकाऱ्यांचे मनपाला पत्र !

औरंगाबाद- औरंगाबाद महानगरपालिकेने ७५ कोटींचा अकृषिक कर थकवला असल्याने हि रक्कम शासनाकडे जमा कारावी असे पत्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महानगरपालिकेचे प्रशासक आस्कित कुमार पांण्डे यांना पाठवले आहे. हि रक्कम तब्बल ७५ कोटी ४६ लाख एवढी आहे.दरम्यान अकृषिक करासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पालिका अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

२००९ शासन निर्णयानुसार अकृषिक कर हा पालिकेद्वारे वसुल केला जातो. मनपा मालमत्ताधारकांकडून वेळोवेळी आकारत असलेल्या करांच्या वसुलीबरोबरच अकृषिक करांचीही वसुली करते. यात जिल्हाधिकाऱ्यांना आकारणी वसुलिचे अधिकार असतात. मनपा अकृषिक कराच्या मागणीच्या रकमा वसूल झाल्यानंतर शासन कोषागारात महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ८ च्या तरतुदीनुसार विहित केलेल्या मुदतीमध्ये भरणा करतील व भरणा केलेल्या रकमेच्या चलनाची एक प्रत त्याचवेळी जिल्हाधिकारी यांना सादर केली जाईल.

मात्र, काही वर्षांपासून औरंगाबाद मनपाकडे जमा होणारा महसूल हा मुदतीत शासन खाती जमा करण्यासाठी धनादेश सुपूर्द केले जात नाहीत. तसेच मनपाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी दिसून येत असल्याचे अपर तहसीलदारांनी या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. मनपाकडे असलेल्या थकबाकीमुळे जिल्ह्यासाठी शासनाद्वारे निश्‍चित वसुली साध्य करण्यामध्ये अडचणी येत आहेत. मनपाकडे अकृषिक कराच्या मागील थकबाकीसह एकूण रक्कम ७५.४६ कोटी रुपये थकीत आहेत, ही रक्कम तातडीने भरावी, असेही या पत्रात प्रशासनाने नमूद केलेले आहे.

Share