मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (२९ जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गेल्या नऊ दिवसांपासून राज्यातील राजकीय उलथापालथीला प्रचंड वेग आला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पन्नासेक आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. आशीष शेलार, आ. गिरीश महाजन आणि अन्य नेत्यांनी काल मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे, अशी विनंती केली. त्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असून, त्यासाठी उद्या गुरुवारी (३० जून) विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची कॅबिनेटची बैठक होती, असे बोलले जाते.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह दहा महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आले. औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याची शिवसेनेची जुनी मागणी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादचा उल्लेख ‘संभाजीनगर’ असा कायमच करत आले आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे नामांतराची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेसचा या निर्णयाला विरोध असल्यामुळे नामांतराचा निर्णय लांबणीवर पडला होता. आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ तसेच उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्याची मागणी मंजूर झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेले या दोन शहराच्या नामांतराचे प्रस्ताव याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावासदेखील कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील काही निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार, हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार, कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार, अहमदनगर–बीड–परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार, तसेच ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार, विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय, निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या ‘एसईबीसी’ उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय आणि शासन अधिसूचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ” हे निर्णयदेखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
आज २९ जून २०२२ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
• औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
• उस्मानाबाद शहराच्या “धाराशिव” नामकरणास मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग)
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नामकरणास मान्यता. (नगर विकास विभाग)
• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. (कृषी विभाग)
• कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)
• अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार (परिवहन विभाग)
• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
• विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय. (नियोजन विभाग)
• निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या ‘एसईबीसी’ उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय (सामान्य प्रशासन विभाग)
• शासन अधिसूचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (महसूल विभाग)
नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची नाराजी
दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून असलेल्या नाराजीतून वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख या काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी आजची कॅबिनेटची बैठक अर्ध्यावर सोडल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत यांनी याआधी ‘मातोश्री’वर जाऊन नामांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर या मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली. यात या नामांतराला पक्षाने विरोध करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे समजते. आता याच नाराजीतून काँग्रेसचे दोन नेते मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतून बाहेर पडल्याची चर्चा रंगली आहे.