ठाणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना आणि शिंदे समर्थकांचे ‘बॅनर वॉर’ सुरू झाल्याचे दिसत आहे. कळवा तसेच ठाणे परिसरात शिंदे समर्थकांनी ‘आम्ही साहेबांसोबत’ असे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवरून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो गायब आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर ठाकरे सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळपास ४० आमदार आहेत. तसा दावा शिंदे यांनी केला आहे. शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदे यांना लाभली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी या बंडखोर शिंदे गटाची मागणी आहे.
आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटरवरून हटवला मंत्रिपदाचा उल्लेख
समर्थक आमदारांना घेऊन शिंदे आधी गुजरातमधील सुरतला आणि त्यानंतर आसामच्या गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या शक्तीप्रदर्शनापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हतबल झाले आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरू असताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून बायो हटवल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
एकनाथ शिंदेंसोबतची चर्चा निष्फळ
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी काल ट्विट करून मी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडला नसल्याचे म्हटले आहे. आता आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा उल्लेख हटवला असला तरी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरून शिवसेनेचा उल्लेख हटवलेला नाही. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक यांना शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवले होते. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना एअरलिफ्ट करून आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणारही नाही. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार, असे ते म्हणाले होते.
आता शिवसेना विरुद्ध ‘शिंदे सेना’ अशी थेट लढाई
ठाणे महापालिकेतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्यासोबत राहतील, असा दावा त्यांचे समर्थक करू लागले आहेत. शिंदे यांचे काही निकटवर्तीय गुवाहाटी येथे त्यांच्या समवेत असल्याचे बोलले जाते. त्यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मंगळवारी ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता. टेंभी नाका येथील आनंद आश्रमात एरवी शिवसैनिकांची गर्दी असते. मात्र, काल या ठिकाणी फारशी गर्दी नव्हती. बुधवारी मात्र ठाणे, कळवा भागात शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी बॅनर लागले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो मात्र लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरमुळे आता शिवसेना आणि ‘शिंदे सेना’ अशी थेट लढाई सुरू झाल्याचे असे संकेत मिळत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकीकडे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक शिंदे यांचा निषेध करत आहेत. त्यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यात ही स्थिती दिसत नाही. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात याकडे ठाणे जिल्ह्यातील विविध पालिकेतील नगरसेवक तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच गाफील ठेवून अचानक केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याचा फटका महाविकास आघाडीसोबत ठाणे आणि डोंबिवली परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांनाही बसणार आहे.
स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते बुचकळ्यात
गेल्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीच्यानिमित्ताने ठाणे आणि डोंबिवलीत जोरदार राजकारण सुरू आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेकडून परस्परांचे कार्यकर्ते फोडले जात आहेत. यापैकी इतर पक्षांमधून शिवसेनेत येणारे कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत आले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे हेच वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत गेल्यास आपले काय होणार, असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेषत: भाजपमधून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांची आणखी गोची होणार आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि मनसेतून इनकमिंग केलेल्या माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची गोची झालेली आहे. तसेच मनसे-भाजपची जवळीक न पटल्याने मनसेतून शिवसेनेत गेलेल्या कार्यकर्त्यांचीही अडचण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.