दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयचा मोठा खुलासा

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंग राजपुत यांची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. दिशा सालियनचा मृत्यू नशेत असताना १४ व्या मजल्यावरून तोल गेल्याने छतावरून पडून झाल्याचा सीबीआयने निष्कर्ष काढला आहे. याबद्दल अहवाल सादर केला आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असल्याचं स्पष्ट केले आहे.

दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. सीबीआय तपास संस्थेनं दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत हे काही काळ काम केले होते, त्यामुळे  दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली आहे.’ एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर द इकोनॉमिक टाइम्सला सांगितलं. तपासात असे समोर आले आहे की, दिशानं तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी  गेट-टूगेदरचं आयोजित केलं होतं. त्याच रात्री मद्य प्राशन केलेल्या दिशाचा तोल गेला आणि ती फ्लॅटच्या पॅरापेटवरून घसरली.’  असंही त्या अधिकाऱ्यानं माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, पार्टीला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि घटना स्थळाच्या पहाणीचा अहवाल यांचा समावेश करून कसून तपास करण्यात आला, ज्यातून सीबीआयनं हा निष्कर्ष काढला.

काय आहे प्रकरण?
२८ वर्षाच्या दिशा सालियानने ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर 6 दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता, त्यानंतर नारायण राणेंनी गंभीर आरोपही केले होते.
Share