भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी ; संजय राऊतांची मागणी

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आणि महिला नेत्यांनी ताबडतोब माफी मागावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, ज्या भाजपच्या नेत्यांनी आणि महिला नेत्यांनी आरोप केले आहेत त्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरेंची माफी मागायला हवी. आरोप केले आहेत तर आता माफी मागा. सीबीआयचा अहवाल आलेला आहे त्यामुळे तुम्ही तोंडाची थुंकी कशाला उडवत होतात आणि एका तरुण नेत्याला कशाला बदनाम करत होतात? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
२८ वर्षाच्या दिशा सालियानने ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात होतं. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. दिशाच्या मृत्युमुळे एकीकडे तिचे आई-वडील दुःखात असताना, दुसरीकडे या घटनेचा सुशांत सिंगलाही धक्का बसला होता. मात्र काही दिवसांनंतर त्याच्याही मृत्यूची बातमी आली. त्यानंतर या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आणि नंतर यात ड्रग्जचा अँगलही समोर आला होता, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले होते?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता.

नितेश राणेेकडून गंभीर आरोप
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा काही संबंध आहे का, याचा तपास झाला पाहिजे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. त्यासाठी तपास झाला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता, असेही नितेश यांनी म्हटले होते.

Share