भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

भोपाळ : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय’, असे सांगत लवकरच तुला मारले जाईल’, अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरून देण्यात आली आहे.

याप्रकरणी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ येथील टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच या घटनेवेळी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हिडीओदेखील रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ञा ठाकूर यांना आलेला धमकीचा फोन नेमका कुठून आला याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा काही पहिला फोन नाही. खासदार झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांना अनोळखी नंबरवरून धमकीचे मेसेज आणि फोन आले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचा देशासोबत परदेशातूनही निषेध करण्यात आला होता. मात्र, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी या विधानाचे समर्थन करत भारत हा हिंदूंचा देश असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता.

Share