५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे उर्वरित बिलाची रक्कम वितरित करण्यासाठी ५० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण विभागातील तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

चंद्रपूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे (वय ४६) यांना ब्रम्हपुरी येथील त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी रात्री १० वाजता ५० लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. या लाच प्रकरणात थेट सहभागी असलेले नागपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील (वय ४६) व चंद्रपूरमृद व जलसंधारण कार्यालयाचे विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम (वय ३५) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

नागपुरातील एका बड्या कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने नागपूर व चंद्रपूर येथील मृद व जलसंधारण कार्यालय येथे कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या कामाचे बिल तथा वितरीत केलेल्या कामाच्या बिलाकरिता आणि उर्वरित बंधाऱ्यांच्या कामाची रक्कम वितरीत करण्याकरिता मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कवीजीत पाटील, चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे तथा विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनी संयुक्तपणे ८१ लाख २ हजार ५३६ रुपयांची लाच मागितली. इतक्या मोठ्या रकमेची लाच देण्याची तयारी नसल्याने कंत्राटदार तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यानुसार चंद्रपूरचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना रविवारी रात्री दहा च्या सुमारास त्यांच्या ब्रम्हपुरी येथील निवासस्थानी ५० लाखांची लाच स्वीकारताना नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे व पथकाने मुद्देमालासह पंचासमक्ष अटक केली.

याच वेळी नागपूर व चंद्रपूर येथे संयुक्त कारवाई करतांना कवीजीत पाटील व विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाटील, शेंडे व गौतम या तिन्ही अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर तिघांच्याही घराची झडती घेण्यात आली.

 

Share