२०२४ मध्ये कोल्‍हापूरची जागा भाजपच जिंकणार : फडणवीस

पुणे : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला असला तरी आम्हाला मिळालेल्या मतांवर आम्ही समाधानी आहोत. या पोटनिवडणुकीत अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत ही जागा आम्ही १०० टक्के जिंकणार याबद्दल तिळमात्र शंका नाही, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोल्‍हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्‍या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी (१६ एप्रिल) लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून आल्‍या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा १९ हजार ३०७ मताधिक्याने पराभव केला. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत जयश्री जाधव यांना ९७,३३२ तर सत्यजीत कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. पुणे येथे आज (१७ एप्रिल) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या निकालावर आपले मत मांडले.

फडणवीस म्‍हणाले, कोल्‍हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्‍या पोटनिवडणुकीत आम्‍ही मिळालेल्‍या मतावर समाधानी आहोत. ही निवडणूक सहानुभूतीची निवडणूक होती. या निकालावरून स्‍पष्‍ट दिसून येते की, कोल्‍हापुरात आमची मते वाढली आहेत. या निवडणुकीत आमच्‍या विराेधात तीन पक्ष लढले, तरीही त्यांची मते वाढलेली नाहीत. त्‍यांच्या मतांची बेरीज पाहा. जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र लढलो होतो त्यापेक्षा जास्त मते या पोटनिवडणुकीत भाजपला मिळाली आहेत. आम्‍ही एकटे लढलो तरी आमची मते वाढली आहेत. त्‍यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपच्‍या उमेदवाराचा नक्की विजय हाेईल. आम्ही वारंवार सांगत होतो की, आम्ही पोकळी भरुन काढतो आहोत, ते आता होताना दिसत आहे.

संजय राऊत वैफल्‍यग्रस्‍त झालेत
भाजप राज्यात दंगली भडकवण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांना सध्‍या काही काम नाही. त्‍यामुळे ते वैफल्‍यग्रस्‍त झाले आहेत. ते दिवसभरात काहीही बोलत असतात. राेज ते टीका करतात. त्‍याच्‍या टीकेला राेज उत्तर काेण देणार? असा सवालही त्‍यांनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत फडणवीस म्‍हणाले, अयोध्येचा दौरा कोणीही करायला हरकत नाही. प्रभू श्रीराम आपले दैवत आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तिथे जावेसे वाटण्यात काहीही गैर नाही. तिथले भव्य मंदिर पाहण्याची इच्छा होणे हे स्वाभाविक आहे. मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या दृष्टीने ही तयारी आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आपल्याला असे वाटत नाही. याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ लावण्याची गरज नाही. भाजपची स्वतःची एक भूमिका असते. आमच्या भूमिकेवर आम्ही चालत असतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

Share