चुलतबहिणीच्या लग्नाच्या दिवशीच भावावर काळाचा घाला

जळगाव : घरात चुलतबहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू असतानाच १३ वर्षीय चुलतभावाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद येथे घडली. प्रणव मुकुंदा पाटील (वय १३ वर्षे, रा. ममुराबाद) असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लग्नघरावर शोककळा पसरली.

ममुराबाद (ता. जळगाव) येथे मुकुंदा दामू पाटील पत्नी व तीन मुलांसह वास्तव्यास आहेत. मुकुंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. आज रविवारी (१७ एप्रिल) मुकुंदा पाटील व त्यांची पत्नी दीपाली असे दोघेजण भावाकडे लग्नघरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव मुकुंदा पाटील (वय १३ वर्षे) हा घरी एकटाच होता. ताईच्या लग्नासाठी जायचे असल्याने प्रणव सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. बाथरूममध्ये आंघोळ करताना त्याला बादलीतील हिटरचा जबरदस्त झटका लागून प्रणवचा जागीच मृत्यू झाला.

लग्नासाठी आलेले मुकुंदा पाटील यांचे नातेवाईक रवींद्र पाटील हे बाथरुमला जाण्यासाठी निघाले असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड करून तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. बाथरूममध्ये मुलगा प्रणवचा मृतदेह पाहताच आई दीपाली, वडील मुकुंदा पाटील यांनी हंबरडा फोडत आक्रोश केला. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात प्रणवचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत प्रणवच्या पश्चात आई दीपाली, वडील मुकुंदा, बहीण वैष्णवी, लहान भाऊ सोमेश असा परिवार आहे. पाटील यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती, सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र, प्रणव पाटील याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे क्षणार्धात चित्र पालटून लग्नघरावर शोककळा पसरली होती. बहिणीच्या लग्नापूर्वीच तिच्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share