मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी भाजपचे षड़यंत्र -संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आक्रमक झालेल्या संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर नवा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून केंद्रशासित प्रदेश करण्याचे षड़यंत्र भाजपने रचले असून किरीट सोमय्या हे त्याचे सूत्रधार आहेत. सोमय्या यांनी मुंबईतील काही धनिक व बिल्डरांना हाताशी धरून हा डाव रचला असून मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्लॅन सादर केला आहे, असा गौप्यस्फोट खा.संजय राऊत यांनी आज केला.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना खा.संजय राऊत म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करुन मुंबई केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न सुरु असून, काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबईला केंद्रशासित करण्याचे जे कारस्थान आहे त्याचे सूत्रधार किरीट सोमय्या आहेत. याशिवाय आणखी दोन अमराठी लफंगे आहेत, त्यातील एक वाराणसीचा आहे आणि एक मोठा बिल्डर आहे जो भाजपचा फायनान्सर आहे. ते सातत्याने दिल्लीत जाऊन मुंबईवर शिवसेनेचे, मराठी माणसाचे नियंत्रण राहू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या हा लंफगा, चोर, महाराष्ट्रद्रोही असून आजही ते सादरीकरण घेऊन दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. हे सादरीकरण कुठे करत आहेत, मुंबईतून कोण मदत करत आहे, भाजपचा सर्वात मोठा फायनान्सर असणारा हा बिल्डर कोण आहे हे मला माहित आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जात आहेत. काही दिवसात मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होत असल्याचा विषय घेऊन हे लोक कोर्टात जाऊ शकतात.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेसाठी जमा केलेल्या पैशात अपहार केल्याचा आरोप केल्यानंतर माजी सैनिकांच्या तक्रारीवरून सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी किती पैसे जमा केले आणि त्या पैशांचे पुढे काय केले याचे उत्तर किरीट सोमय्या देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी चोरी केली असून राष्ट्रीय सुरक्षेशी किरीट सोमय्या यांनी खेळ केला आहे, अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली. सेव्ह विक्रांतच्या नावाने सोमैय्यानी किती पैसे जमा केले हे पोलिस तपासात सिद्ध होईलच. मला विचारलं तर माझा आकडा देईन. तुम्ही पैसे गोळा करून त्या पैशांचा कुठे वापर केला याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही हे पैसे पचवून ढेकर दिले आहेत. त्याचा दुर्गंध मुंबईत येत आहे. जर भाजपचे नेते या गैरव्यवहाराचे समर्थन करणार असतील तर त्यांची काश्मीर फाईलप्रमाणे वेगळी फाईल तयार करावी लागेल. ही विक्रांत फाईल आहे.

किरीट सोमय्याचे प्रकरण अफजल गुरु आणि अजमल कसाबइतके गंभीर आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी खेळलेला हा माणूस आहे. तो मोठ्याने बोलतो, खोटे बोलतो, नौटंकी करतो, असे सांगून सोमय्याप्रमाणे आणखी १० प्रकरणे मी लवकरच बाहेर काढणार आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

Share