कर्नाटकात भाजपची खेळी यशस्वी; तीन जागांवर विजय

बंगळुरु : राज्यसभेच्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपने तीन जागांवर तर काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. जेडीएसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, जग्गेश आणि लेहर सिंघ सिरोया हे भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे जयराम रमेश हेही विजयी झाले आहेत.

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत एकूण ५७ जागांपैकी ४१ जागा बिनविरोध निघाल्या आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक झाली. महाराष्ट्रातील ६ जागांपैकी ३ जागा भाजपने जिंकल्या असून, कॉँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येकी १ जागा पटकावली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे भाजपचे तीनही उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.

कर्नाटकमध्ये भाजपचे १२१ आमदार असूनदेखील त्यांनी तीन जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेसने ७० आमदार असताना २ उमेदवार दिले होते, तर जनता दल (सेक्युलर) ने ३२ आमदार असताना १ उमेदवार दिला होता. मात्र, भाजपने तीन जागांवर विजय मिळवला असून, काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपच्या निर्मला सीतारमण यांना ४६ मते मिळाली, तर जग्गेश यांनाही ४६ मते मिळाली. लहर सिंह सिरोया हे भाजपचे तिसरे उमेदवार ३३ मते मिळवून विजयी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हे ४६ मते मिळवून विजयी झाले आहेत.

राज्यस्थानात काँग्रेसला तीन जागांवर यश

राजस्थानमधून काँग्रेसचे प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला विजयी झाले आहेत, तर भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. राजस्थानमध्ये सुभाष चंद्रा यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नियोजनामुळे काँग्रेसला तिन्ही जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला हे ४३ मते, मुकुल वासनिक हे ४२ मते आणि प्रमोद तिवारी हे ४१ मते मिळवून निवडून आले आहेत. भाजपचे घनश्याम तिवारी हे ४३ मते मिळवून विजयी झाले आहेत. अपक्ष उमेदवार डॉ. सुभाष चंद्रा हे पराभूत झाले असून, त्यांना ३० मते मिळाली.

हरियाणात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा
हरियाणामध्ये दोन जागांवर भाजप आणि काँग्रेस उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून कृष्ण पाल पंवार तर अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले आहेत. काँग्रेसचे एक मत बाद ठरल्याने अजय माकन यांचा पराभव झाला आहे. भाजपचे कृष्ण पाल पंवार हे ३१ मिळवून विजयी झाले आहेत.

Share