शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण; आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून चप्पल व दगडफेक केली होती. राज्य गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान काही वेगवान हालचाली घडत असताना आता गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजभर यांनाही हटवण्यात आले आहे.

याआधी या घटनेनंतर परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या चुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाच महिन्यांपासून संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (८ एप्रिल) दुपारी आक्रमक होत शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी चाल करीत हल्लाबोल केला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे नेते वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० जणांना अटक केली आहे. आता या प्रकरणात पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला हे मुंबई पोलिसांचे अपयश असल्याची टीका झाल्यानंतर शनिवारी या विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले पोलिस उपायुक्त योगेश कुमार गुप्ता यांना हटवण्यात आले. परिमंडळ-२ चे तत्कालीन उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडिया वसुली प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गायब झाले. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांना हटविण्यात आल्यानंतर परिमंडळ-२ चा अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे देण्यात आला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला चढवला होता. या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर इतर १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या देवगिरी बंगल्यावर उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांची व सरकारी वकिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्याचे महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित आहेत.

Share