चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व पुन्हा एकदा धोनीकडे;रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघात संजीवनी आणण्यासाठी संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आले आहे. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रवींद्र जडेजाने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे.

उर्वरित सामन्यात धोनी कर्णधार असणार आहे. त्यातच यंदाच्या आयपीएलमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा आज हैदराबादविरुद्ध सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दोन दिवस आधीच अचानकपणे महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली होती. आता हंगामाच्या मध्यावरच रवींद्र जडेजाकडून नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा धोनीकडे आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जडेजाच्या नेतृत्वाखली चेन्नई संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर जडेजाची कामगिरीही नेतृत्वामुळे खालावत असल्याचे दिसत होते. त्यामुळे आपली कामगिरी चांगली व्हावी आणि संघाच्या विजयात आपलेही योगदान असावे, यासाठी जडेजाने यावेळी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त २ सामन्यात चेन्नईला विजय मिळवण्यात यश आले आहे. जडेजाच्या नेतृत्त्वाखाली खेळलेल्या सीएसकेला आलेल्या या अपयशानंतर पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद धोनीकडे देण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे आता सहा सामने राहिले आहेत. जर त्यांना ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना जवळपास सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत चेन्नईने पुन्हा एकदा नेतृत्व धोनीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वर्षी देखील चेन्नईने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी चांगल्या फॉर्मात आहे. सीएसकेने जे दोन सामने जिंकले आहेत, त्यात धोनीचा मोलाचा वाटा आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तर धोनीने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत चेन्नईला विजय मिळवून दिला होता. जरी धोनी कर्णधार नसला तरी तोच संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याचे पाहायला मिळत होते. त्याचबरोबर धोनीची फलंदाजीही पूर्वीसारखी बहरत होती. धोनी हा पूर्वीसारखा फिनिशरची भूमिका बजावत असल्याचे पाहायला मिळत होते; पण चेन्नईच्या संघाची कामगिरी मात्र सुधारत नव्हती. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये जडेजाच्या नेतृत्वाखाली आठ सामने खेळले असून, ८ पैकी फक्त २ जिंकले आहेत. सध्या चेन्नईचा संघ ४ गुण मिळवून गुणतालिकेत ९ व्या स्थानावर आहे.

आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध असून, केवळ हाच सामनाच नव्हे तर ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळवण्यासाठी राहिलेले सर्व सहा सामने चेन्नई संघाला जिंकावे लागतील. यावर्षी आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर सात संघांनी लगेचच खाते उघडून दमदार वाटचाल सुरू केली; परंतु मुंबई, चेन्नई आणि हैदराबादला पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवला आला नव्हता. त्यानंतर हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जलाच हरवून पहिला विजय मिळवला होता. आता त्याच चेन्नईविरुद्ध त्यांचा दुसरा साखळी सामना होत आहे.

हैदराबाद सनरायजर्सने सलग पाच विजय मिळवून लय मिळवली आहे. मात्र, चेन्नईचा संघ आठपैकी दोनच सामने जिंकू शकलेला आहे. हैदराबादला गाडी रुळावर आणण्यासाठी गोलंदाजांचा आत्मविश्वास भक्कम करावा लागणार आहे. बंगळूर (आरसीबी) विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात तीन बळी मिळवणारा मार्को जेन्सन हिरोचा झिरो ठरला होता. गुजरात संघाच्या रशीद खानने त्यानंतर अंतिम षटकात तीन षटकार मारून जेन्सनचा आत्मविश्वास खच्ची केला होता.

केन विल्यम्सन अपयशी
हैदराबाद संघ एकीकडे प्रगती करत असताना त्यांचा कर्णधार केन विल्यम्सन मात्र अपयशी ठरत आहे. संघातील इतर खेळाडू अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, मार्करम हे फलंदाज योगदान देत असल्यामुळे विल्यम्सनवरचा भार हलका होत आहे. गुजरातविरुद्ध शशांक सिंगने सहा चेंडूत नाबाद २५ धावा करून सर्वांचे लक्ष वेधले होते. असे असले तरी आता केन विलम्यम्सनला चांगला खेळ करावाच लागणार आहे.

चेन्नई संघाच्या कामगिरीकडे लक्ष
चेन्नई सुपर किंग्ज संघात महेंद्रसिंह धोनीसारखे अनुभवी खेळाडू असले तरी कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. आधीच्या सामन्यात भरीव कामगिरी करणारा खेळाडू पुढच्या सामन्यात अपयशी ठरत आहे. चेन्नई संघातील ऋतुराज गायकवाड, रॉबीन उथप्पा, अंबाती रायडू यांना आता सातत्य दाखवावे लागणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आता कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share