महाराष्ट्राने अशा ‘सुपारी’ सभा खूप पाहिल्या

औरंगाबाद : मनसे कुठल्याही भूमिकेवर ठाम राहत नाही. आधी मराठी-मराठी केलं आणि आता भोंगा-भोंगा करत आहेत. भुंगा आणि कमळाचं नातं असतं, हे मला माहीत होतं. मात्र, आता भोंगा आणि कमळाचं नातं पाहायला मिळत आहे. तेही किती दिवस टिकते, हे बघावे लागेल. महाराष्ट्राने अशा ‘सुपारी’ सभा खूप पाहिल्या आहेत, अशी बाेचरी टीका राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.

मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. राज ठाकरे यांची आज १ मे (रविवार) रोजी सायंकाळी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होत आहे. या बहुचर्चित ‘राज’ सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद येथे मुख्य ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आता कुणी नवे-नवे कार्यक्रम घेत आहेत. ते किती दिवस टिकतात तेही दिसेलच. आधी मराठी होते, आता भोंगा सुरू आहे. भोंगा आणि ‘कमळा’चे नाते झाले आहे. आता हा भोंगा कमळाला किती त्रास देतो हे पुढच्या काळात कळेलच. भोंग्याच्या मुद्द्यावरून शहराची सामाजिक शांतता बिघडण्याच्या मुद्द्यावर देसाई म्हणाले, त्याची काळजी घेण्यासाठी पोलिस प्रशासन सक्षम असून शांततेला गालबोट लागणार नाही. कोणी कितीही चिथावणी दिली तरी जनता सुज्ञ असून, जनता डोकी भडकावून घेणार नाही. लोक चाणाक्ष आहेत.

शिवसेनेचे हिंदुत्वाशी अभेद्य नाते
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला संभाजीनगर असे नाव दिले. येथील नागरिक ती आठवण आजही जतन करत असून, शिवसेनेचे हिंदुत्वाशी अभेद्य नाते आहे. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, असे देसाई म्हणाले.

Share