औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.
या सभेच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सभेला सुरुवात होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत.
होय… संभाजीनगरच!
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा.
वेळ:- बुधवार दि. ८ जून २०२२, सायं. ६:०० वाजता
स्थळ:- मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, संभाजीनगर pic.twitter.com/2Sankqba3M— ShivSena – शिवसेना (@ShivSena) June 6, 2022
दरम्यान काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमधील याच मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सभा घेतील होती. याच सभेत राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच औरंगाबादचं नामांतर करण्याची मागणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या या टीकेला आज उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.