आदित्य-श्वेताच्या घरी चिमुकल्याचं आगमन

मुंबई : गायक आदित्य नारायण आणि पत्नी श्वेता अग्रवाल आईबाबा बनले आहेत. नुकतंच आदित्य नारायणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. आदित्य नारायण आणि श्वेताला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. श्वेताने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे.

आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट मध्ये सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता त्याचे ऐकले. गतवर्षी आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, श्वेताच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. आदित्यने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सगळे मला सांगत होते की, तुम्हाला मुलगाच होणार आहे. मला मात्र मुलगी होणार याची खात्री होती. मी देवाकडेदेखील मुलगी व्हावी, अशी प्रार्थना करत होतो. मला वाटतं की मुली या कायम त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात. देवाच्या कृपेने मला देखील मुलगीच झाली. याचा मला खूप आनंद आहे. श्वेता आणि मला एका मुलीचा पालक झाल्याचा खूप आनंद झाला आहे.

तो पुढे म्हणाला, जेव्हा श्वेताने मुलीला जन्म दिला तेव्हा मी तिच्यासोबत होतो. तो क्षण पाहून आणि तिला प्रचंड वेदना होत असताना पाहून मला जाणवलं की एवढी ताकद फक्त  स्त्रीमध्येच असू शकते. हे सर्व पाहिल्यानंतर माझे श्वेताबद्दलचे प्रेम आणि आदर आता द्विगुणित झालं आहे. त्याने म्हटलं की, मी पाहिले आहे की, जेव्हा एखादी महिला मुलाला जन्म देते आणि गर्भधारणेच्या टप्प्यातून जाते तेव्हा तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Share