अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी परवानगी देण्यास ईडीचा विरोध

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना मनी लाँड्रिंग आणि इतर वेगवेगळ्या आरोपाखाली काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली असून, हे दोन्ही नेते सध्या तुरुंगात आहेत. या दोन नेत्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी परवानगी मागणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. ईडीच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारचे अर्थात महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर मंत्री नवाब मलिक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी ईडीने आपले उत्तर न्यायालयात सादर केले आहे.

कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असे स्पष्ट करत ईडीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून न्यायालयात केलेल्या अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम ६२ नुसार हा एक औपचारिक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना मतदानासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे ईडीने कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी उद्या बुधवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांना काही तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णवाहिकेतून विधानभवनात नेण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मलिक या निवडणुकीत मतदान करू शकतील आणि मतदानानंतर रुग्णालयात परत येतील, अशी विनंती मलिक यांच्यावतीने न्यायालयास करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सेवा आणि पोलिस बंदोबस्ताचा खर्चही मलिकच उचलतील, असे आश्वासनही न्यायालयाला देण्यात आले आहे. दुसरीकडे विधानभवनाच्या आवारात केवळ २८८ आमदारांनाच मतदान करण्यास मुभा आहे, त्यामुळे पोलिस एस्कॉर्ट यासाठी अडथळा ठरणार नाही. मात्र, तरीही आपण पोलिस बंदोबस्ताचे शुल्क भरण्यास तयार असल्याचे देशमुख यांच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच द्वंद्व पहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. एकेका मतासाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना १० जून रोजी राज्यसभा सदस्यांच्या निवडणुकीसाठी विधान भवनात मतदान करण्यास परवानगी देऊ नये, अशी भूमिका घेत विरोध दर्शवल्याने आता उद्या न्यायालय सुनावणीअंती काय निर्णय देते त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या जामिनाला केतकी चितळेचा विरोध; याचिका दाखल

१०० कोटी वसुली प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने याचिका दाखल केली आहे. देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या याच जामीन अर्जाविरोधात केतकी चितळेने याचिका दाखल केली आहे. देशमुख यांना जामीन मंजूर करू नये, ते फरार होतील, असा दावा केतकीने याचिकेतून केला आहे. देशमुख यांना जामीन मिळाला तर ते फरार होतील. त्यांना शोधायला महाराष्ट्र पोलिस सीबीआय आणि ईडीला सहकार्य करणार नाहीत. अनिल देशनुख सापडत नाहीत, असा अहवाल सादर केला जाऊ शकतो, अशी भीती केतकी चितळे हिने व्यक्त केली आहे.

Share