धारूरच्या व्यापार्‍यावर प्राणघातक हल्‍ला

बीड : किल्लेधारूर येथील आडत व्यापारी मारुतीराव गायके हे हात, पाय बांधलेल्या व गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गायके यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्‍ला झाल्याने धारूर परिसरातील व्यापार्‍यांमध्‍ये खळबळ उडाली आहे.

सोमवारी (२५ एप्रिल) रात्री किल्लेधारूर येथील आडत व्यापारी मारुतीराव गायके हे केज येथे गेले होते. रात्री उशिरापर्यंत परत आले नसल्याने नातलगांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास केज रस्त्यावर त्यांचा शोध घेतला. कासारी पाटीजवळ मारुतीराव गायके यांची दुचाकी पडलेली दिसली. शोधाशोध केली असता काही अंतरावर गायके हे हात, पाय बांधलेल्या व गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. गायके यांच्या पाठीवर व मांडीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यांना तात्काळ धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एस. आटोळे यांनी सांगितले की, “व्यापारी गायके घरी परत आले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला. केज रस्त्यावर कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते बेशुद्ध अवस्थेत असून तपास सुरू आहे. दरम्यान, मारुतीराव गायके यांना चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.

Share