कार-ट्रकचा भीषण अपघात; १ ठार

औरंगाबाद : कारचालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजक फोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या भरधाव ट्रकला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार, तर कारचालक किरकोळ जखमी झाला. हा भीषण अपघात शेंद्रा एमआयडीसीतील कुंभेफळ फाट्याजवळील श्री साई इंटरप्रायजेस या दुकानासमोर सोमवारी (२५ एप्रिल) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला.

यावेळी ट्रकच्या पाठीमागील बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या खाली घालत एका लोखंडाच्या दुकानातील लोखंडी सळ्यावर व दगडी कंपाउंडच्या बांधकामाला धडकवल्याने बसमधील ५१ प्रवाशांचे प्राण वाचले. सदरील कार ही जालना येथील एसआरजे स्टील या लोखंडी सळ्या बनवणार्‍या कंपनीची असल्याचे कळते. सदरील कार (क्र. एम. एच. २१/ए. एच. ६३९८) औरंगाबाद येथून जालन्याकडे चालली होती. शेंद्रा एमआयडीसीनजीक कुंभेफळ फाट्यावरून पुढे जाताच लाडगाव उड्डाणपुलाच्या अलीकडे कारचालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला व कार थेट रस्ता दुभाजक फोडून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला फेकली जाऊन ती जालना येथून औरंगाबादच्या दिशेने लोखंडी सळ्या भरून जाणार्‍या ट्रक (क्र. टी. एस. १३/व्ही. सी. ७२४१ ) ला धडकली. या घटनेत कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेले कंपनीचे वसुली अधिकारी अमेर उस्मानी (वय ४२ वर्षे, रा.जालना) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक दत्ता मोरे (वय ३८ वर्षे, रा. अंबड, जि.जालना) यांच्या डोक्याला किरकोळ मार लागून ते जखमी झाले.

ही धडक एवढी जोराची होती की, ट्रकने ही कार सुमारे शंभर फूट अक्षरशः क्लिनर बाजूने फरफटत नेली. मृत अमेर यांना कारमधून बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. याच वेळी या ट्रकमागे हिंगोली डेपोची हिंगोली ते पुणे जाणारी बस (क्र.एम. एच. ०६/ एस.८६४५) होती. ही बस समोरील सळया भरलेल्या ट्रकला धडकणार तोच क्षणाचाही विलंब न करता बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्यालगत असलेल्या लोखंडी सळयावर घातली. यात बस लोखंडी सळयावरून चढून दुकानाच्या दगडी बांधकाम असलेली कंपाऊंडची सुमारे दहा फूट भिंत फोडत दुकानातील लोखंडी रॅक व लिंबाच्या झाडाला धडकत बंद पडली. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या ५१ प्रवाशांचा जीव वाचला. बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेत श्री साई इंटरप्रायजेस दुकानाचे संचालक रावसाहेब शेळके यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Share