राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी : बाळा नांदगावकर

मुंबई : मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आंदोलन छेडल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यासंदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण उघड केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.

बाळा नांदगावकर म्हणाले की, राज ठाकरेंना आणि मला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने या धमक्या मिळत असून या पत्रात उर्दू शब्दांचा वापर केल्याचा दावा नांदगावकरांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत राज्य, केंद्र सरकारनं दखल घ्यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांची भेट घेतली असून गृहमंत्री याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बोलले असल्याचे नांदगावकरांनी सांगितले.

Share