लेबर कॉलनीतील बेघरांना विभागीय आयुक्तांचा दिलासा, म्हणाले – बेघरांचे पुनर्वसन करू

औरंगाबाद : शासकीय कर्मचाऱ्यांची ६५ वर्षांपासून वसाहत असलेली लेबर काॅलनी जमीनदोस्त करण्यास आज पहाटे ६ वाजेपासूनच सुरूवात झाली. लेबर काॅलनीतील ३३८ घरांवर बुलडोझर फिरवण्यात येत आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पाडापाडीला सुरूवात होताच रहिवाशांना अश्रू अनावर झाले. ही कारवाई सुरू असताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी लेबर कॉलनी परिसराची पाहणी केली. यावेळी सरकारने आमचे पुनर्वसनदेखील केले नाही, असा आक्रोश रहिवाशांनी केला.

यावर बोलताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, लेबर कॉलनीतील घरे धोकादायक स्थितीत होती. ती कधीही पडण्याची भीती होती. त्यामुळे त्यावर कारवाई करणे आवश्यक होते, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले की, आज कारवाई अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली आहे. कायदेशीर लढाई संपल्यानंतर रहिवासी तसेच येथील राजकीय नेत्यांनीही आम्हाला सहकार्य केले आहे. आजच्या कारवाईमुळे जे खरेच बेघर झाले आहेत, त्यांची यादी करण्याची सूचना औरंगाबाद पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. अशा बेघरांचे पुनर्वसन केले जाईल. त्यांना पर्यायी घरे दिले जातील, असे सुनील केंद्रेकर यांनी सांगितले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, जे गुंडगिरी करून या कॉलनीत शिरले आहेत, त्यांना आम्ही अजिबात थारा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share