फोटो डिलीट करता की कारवाई करु? राष्ट्रवादी काॅंग्रेस

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने गंभीर आरोप केला होता. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून काम पाहत असल्याचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीने हा आरोप केला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता. श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विट त्यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो टि्वट केला. या फोटोवरून राजकारण रंगलं आहे. या फोटोवरुन राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी शीतल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो वर आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली. शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे. त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या स्पष्ट हेतू या फोटोतून दिसत आहे. मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई करावी. तसेच शीतल म्हात्रे यांनी सुप्रियाताईंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराच पक्षाच्या वतीने क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.

 

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. २३ एप्रिल २०२१ रोजी कोव्हिड उपाय योजनांबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. राज्यातील महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उध्दव ठाकरे हे वर्षा या शासकीय निवासस्थानातून तर तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांसोबत सदर बैठकीस मंत्रालयातून सहभागी झाले होते. त्यावेळेचा हा फोटो आहे, अशी माहिती देऊन राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती नलावडे यांनी शीतल म्हात्रे यांचा दावा खोडून काढला आहे.

Share