नवरात्रीचे नऊ रंग; काय आहे ‘या’ रंगांचं महत्त्व

मुंबई : नवरात्र हा देवी दुर्गाला समर्पित ९ दिवसांचा उत्सव आहे. शारदीय नवरात्री, शक्तीच्या उपासनेचा सण, २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. ते ५ ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची ९ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीत ९ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, प्रत्येक दिवसातील रंगांचे महत्त्व.

नवरात्रीचे नऊ रंग आणि महत्व

१. नवरात्र प्रतिपदा तिथी (पांढरा) (White)

शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२ रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. सोमवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा म्हणजेच श्वेत रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग धारण केल्याने आत्मविश्वाव वाढतो.

२. नवरात्र द्वितीया तिथी (लाल) (Red)

नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी मंगळवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.

३. नवरात्र तृतीया तिथी (नारंगी) (Orange)

शारदीय नवरात्रौत्सावाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २८सप्टेंबर हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. बुधवारी चंद्रघंटा देवीला नारंगी रंगाचं वस्त्र अर्पण केलं जाईल. नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे.

४. नवरात्र चतुर्थी तिथी (पिवळा) (Yellow)

नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी २९ सप्टेंबरला कुष्मांडा देवीची रूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचं प्रतिक आहे.

५. नवरात्र पंचमी तिथी (हिरवा) (Green)

शारदीय नवरात्रौत्सावाच्या पाचवा दिवस ३० सप्टेंबरला आहे. या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाईल. देवी स्कंदमातेला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग निसर्गाचं प्रतिक आहे. हिरवा धारण केल्यानं चैतन्यामध्ये वृद्धी होते.

६. नवरात्र षष्ठी तिथी (राखाडी) (Grey)

नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी १ ऑक्टोबरला कात्यानी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी देवीला राखाडी रंगाचं वस्त्र चढवलं जाईल. राखाडी रंग बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे.

७. नवरात्र सप्तमी तिथी (निळा) (Blue)

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. २ ऑक्टोबरला सप्तमीच्या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. आकाश आणि पाण्याचा निळा रंग हा विश्वासाचं प्रतिक आहे.

८. नवरात्र अष्टमी तिथी (जांभळा) (Purple/Violet)

नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी अष्टमी ३ ऑक्टोबरला सोमवारी आहे. यादिवशी महागौरीची आराधना केली जाईल. या दिवशी जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचं प्रतिक आहे. या दिवशी कन्यापूजेचा मुहूर्त आहे.

९. नवरात्र नवमी तिथी (गुलाबी) (Pink)

शारदीय नवरात्रौत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. ७ ऑक्टोबरला नवमी दिवशी गुलाबी रंग शुभ आहे. गुलाबी रंग प्रेमाचं आणि स्त्री शक्तीचं प्रतिक आहे.

नवरात्रीच्या ९ दिवसांतील प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग नियुक्त केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांनी रोज ठराविक रंगानुसार कपडे घालण्याची प्रचलित प्रथा आहे. ही परंपरा प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात खूप प्रचलित आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात महिला दररोज विशिष्ट रंगाचे कपडे आणि वस्तू घालतात. नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना काम करावे लागते किंवा दांडिया आणि गरबा करावा लागतो, नवरात्रीच्या दिवसाच्या रंगानुसार कपडे घालण्यासाठी त्या नेहमीच उत्सुक असतात.

Share