अभिनेता सलमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने सलमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सलीम खान हे ५ जून रोजी सकाळी फिरण्यासाठी गेले होते. तिथे ते एका बाकावर बसले असताना त्यांना एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मुसेवालासारखी होईल. सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहिले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आहे, त्यामुळे सलमानच्या जीवालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सलीम खान आणि त्यांचा मुलगा अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यामुळे राज्याच्या गृह विभागाने त्वरित दाखल घेत सलमान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान, ‘आयफा अवॉर्ड्स २०२२’ साठी अबू धाबीला गेलेला सलमान खान रविवारीच मुंबईला परतला आहे. सलमान गेल्या काही महिन्यांपासून त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Share