देवेंद्र फडणवीसांनी एका दमात म्हटली हनुमान चालिसा!

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज (सोमवार) मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्याच्या प्रकरणावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला न जाण्यामागची भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली. त्याचाच धागा पकडून उपस्थित पत्रकारांनी हनुमान चालिसेवर फडणवीसांना प्रश्न विचारला. यावेळी एका दमात फडणवीसांनी संपूर्ण हनुमान चालिसा म्हटली. यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भाजप नेतेही फडणवीसांकडे पाहतच राहिले.

पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंगे, हनुमान चालिसावरून वातावरण पेटले आहे. मशिदीवरचे अनधिकृत भोंगे जर हटवले नाही तर मनसैनिक मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावतील, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. मनसे प्रमुखांनी आदेश दिला खरा; पण किती जणांना हनुमान चालिसा येते, याची चर्चा नंतरच्या काळात सुरू झाली. राजकारणी मंडळी हनुमान चालिसावर बोलली की, पत्रकार मंडळी त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचा आग्रह करू लागले. आज असाच आग्रह पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. यानंतर पुढची ४० सेकंद फडणवीस न थांबता हनुमान चालिसा म्हणत होते.

यावेळी फडणवीस यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला, राणा दाम्पत्याला झालेली अटक यावरून ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ठोकशाहीची भाषा बोलणाऱ्या सरकारला ठोकशाहीनेच उत्तर देऊ, असे ते म्हणाले. गृहखात्यावर दिलीप वळसे पाटील याचे नियंत्रण नाही. सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. राज्यातील भाजप नेत्यांना टार्गेट केले जात आहे. मोहित कंबोज यांचा मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. किरीट सोमय्यांवर पोलिस असतानाही हल्ला झाला. ज्यांना लोकशाही मान्य नाही ते आमच्या पोलखोल आंदोलनावर हल्ला करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर बोगस केसेस केल्या जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

भोंगा प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले…?
सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार सगळ्या समाजाने आदर राखून संबंधित नियमांची अंमलबजावणी करायला हवी. गेली अनेक वर्ष नवरात्र, गणपती उत्सव या काळात देखील हिंदू समाजाने कोर्टाच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी केली. पुण्यातल्या गणेशोत्सवाला १५० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. तिथेही विसर्जनावेळी रात्री १० नंतर लाऊड स्पीकर लावला जात नाही. नवरात्र उत्सव काळात देखील रात्री १० नंतर हिंदू समाज लाऊड स्पीकरचा आग्रह धरत नाही. मग जर हिंदू समाज गाईडलाइन्सचे पालन करत असेल तर इतर सर्वच समाजाने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइन्सचे पालन करावे, असा आमचा आग्रह असेल, असे देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

Share