महाराष्ट्रात हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले

मुंबई : महाराष्ट्रात काेणाचीही हुकूमशाही चालणार नाही. येथे कायद्याचे राज्‍य आहे. तुमचा अल्टिमेटम तुमच्या घरातल्यांना द्या, आम्हाला नको. महाराष्ट्रात अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये. सरकार अल्टिमेटमवर नाही चालत, ते कायद्यानेच चालते, अशा शब्‍दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टाेला लगावला. गुरुवारी मुंबई येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्‍हणाले, राज्‍यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. सगळ्यांना नियम सारखे आहेत. जर कोणाला असे वाटत असेल की, मी असे म्हटले तर तसे होईल तर ते चालणार नाही. भोंग्यांसाठी अधिकृत परवानगी घ्यावी लागेल. हे आवाहन करूनदेखील कोणी परवानगी घेतली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सुप्रीम कोर्टाने २००५ साली निकाल देऊन आवाजाची मर्यादा लागू केलेली आहे. लोकांनी कोर्टाच्या नियमांचे पालन करावे आणि अजूनही ज्या मंदिरांच्या आणि मशिदीच्या भोंग्यांना परवानगी घेतलेली नसेल त्यांनी ती कायदेशीररित्या काढून घ्यावी. अगोदर सगळे काही चांगले सुरू होते. आताच हा विषय पुढे आला आणि सगळे काही बिघडले. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातली काकड आरतीही आता बंद झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे  तंतोतंत पालन करायचे असेल तर हे होणारच, असेही पवार  म्हणाले.

भोंग्यांविषयी जो काही निर्णय घेण्यात येईल तो सर्व धर्मांना लागू होईल. आपल्या राज्यात जितकी धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी. काहीही झाले तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आवाजाची मर्यादा ही पाळावीच लागेल. कोणत्याही धार्मिक स्थळाकडून भोंग्याबाबत परवानगी घेण्यात आली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नागरिकांनी कोणत्याही भावनिक आवाहनाला बळी पडू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

बहुमत असेल तर तृतीयपंथी व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते : अजित पवार
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जालन्यातील एका कार्यक्रमात बोलताना, ब्राह्मण समाज सर्व समाजाला दिशा देणारा आहे. मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही. तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे वक्तव्य केले होते. दानवे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगदी तृतीयपंथी व्यक्तीही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकते, असे म्हटले. राज्यात कुठल्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीनेच मुख्यमंत्री व्हावे, असे म्हणणे योग्य नाही. मुख्यमंत्री कोणीही होऊ शकते. तृतीयपंथी व्यक्तीसुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते किंवा एखादी महिला अथवा कुठल्या जाती-धर्माची व्यक्तीही मुख्यमंत्री होऊ शकते. यामध्ये काहीच हरकत नाही. जो कोणता पक्ष १४५ चा बहुमताचा आकडा जमवेल त्यांचा मुख्यमंत्री बसेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी याप्रसंगी केले.

Share