चंद्रपूरमध्ये डिझेल टँकर आणि ट्रकचा अपघात; आगीच्या भडक्यात ९ जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे गुरुवारी रात्री उशिरा डिझेल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात ९ जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

वडसा येथून ट्रक (क्र. एम. एच. ३१/सी. क्यू. २७७०) लाकूड घेऊन चंद्रपूरला येत होता तर डिझेलने भरलेला टँकर (क्र. एम. एच. ४०/बी. जी. ४०६०) चंद्रपूरवरून मूलकडे जात होता. गुरुवारी (१९ मे) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या अजयपूर येथे या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने लाकडाच्या ट्रकला आग लागली. आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले.

अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडाला. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल आणि चंद्रपूर येथील अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या आगीत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले.

लाकूड भरलेल्या ट्रकचा चालक अजय सुधाकर डोंगरे (वय ३० वर्षे, रा. बल्लारपूर) तसेच प्रशांत मनोहर नगराळे (वय ३३ वर्षे), मंगेश प्रल्हाद टिपले (वय ३० वर्षे), महिपाल परचाके (वय २५ वर्षे), बाळकृष्ण तुकाराम तेलंग (वय ४६ वर्षे), साईनाथ बापूजी कोडापे (वय ४० वर्षे, रा. नवी दिल्ली), संदीप रवींद्र आत्राम (वय २२ वर्षे, रा. तोहोगाव कोठारी) या मजुरांसह डिझेल टँकरचालक हनिफ खान (वय ३५ वर्षे, रा. अमरावती) आणि क्लीनर अजय पाटील (वय ३५ वर्षे, रा. वर्धा) हे दोघे ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मरण पावले.

Share