वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलणार,जिल्हा व्याघ्र समितीची दौलताबादेत बैठक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा व्याघ्र समितीची बैठक ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दौलताबाद येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत संपन्न झाली.  बैठकीस उपवनसंरक्षक तथा सहअध्यक्ष जिल्हा व्याघ्र समिती  सूर्यकांत मंकावार,  विभागीय वन अधिकारी वन्यजीव अमितकुमार मिश्रा ,  सचिन कंद,  किशोर  पाठक,  सहाय्यक वनसंरक्षक अरुण पाटील, सचिन शिंदे , राजेंद्र नाळे,  आशा चव्हाण,  वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर, दादासाहेब तौर, सपकाळ आनंद गायके, रोहिणी साळुंके, सुशील नांदवटे, राहुल शेळके, सागर ढोले,  पोलीस निरीक्षक भजंग हातमोडे, संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत वन्यजीवांची तस्करी रोखण्यास आळा घालणे, वन्यजीवांच्या तस्करी मध्ये सक्रिय असणाऱ्या संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे, पोलीस विभागाकडे असलेला आरोपीचा डेटाबेस वनविभागाला चौकशी कामी पुरविणे तसेच वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ , भारतीय वन अधिनियम १९२७, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६, जैवविविधता कायदा २००२, महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४  इत्यादी कायद्याच्या तरतुदीवर सविस्तर चर्चा झाली. तसेच वनसंपत्तीचे अवैध उत्खनन जंगला शेजारील गावांमध्ये होत असलेल्या गावठी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्याचा बंदोबस्त करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली .वनविभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी दोन्ही  विभागांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार  यांनी व्यक्त केले,  तसेच पोलीस अधीक्षक  निमित गोयल यांनी कायद्यामधील विविध तरतुदीवर मार्गदर्शन केले.

Share