ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले, टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर ही जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी विकत घेतली आहे. ट्विटरमधील १०० टक्के भागीदारी मस्क यांनी खरेदी केली आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ४४ अब्ज डॉलरला सौदा निश्चित केलाय. या घडामोडीनंतर ट्विटरचा आजवरचा प्रवास आणि इलॉन मस्क यांचा हा निर्णय यावरून अनेक चर्चा होत आहेत. यादरम्यान आपण जाणून घेऊया की जेव्हा ट्विटरची सुरुवात झाली होती तेव्हा सर्वात आधी कोणी आणि काय ट्विट केले होते.

ट्विटरच्या स्थापनेपासून अनेक बदल झाले आहेत परंतु काही घटना अशा आहेत ज्यांनी ट्विटरमध्ये बदल केला. बहुतांश लोकांना याबद्दल माहित नसेल की मार्च २००६ मध्ये तंत्रज्ञान जाणकार उद्योजक जॅक डोर्सी, बिझ स्टोन आणि इव्हान विल्यम्स यांनी ट्विटरची निर्मिती केली होती. फ्लिकर हा शब्द ऐकून या टीमला त्याच्या नावाची कल्पना सुचली, त्यानंतर त्यांनी या ब्लू बर्ड ड्रीम कंपनीला twttr असे संबोधले. जॅक डोर्सीने त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले- ‘जस्ट सेटिंग अप माय ट्विटर’. २२ मार्च २००६ ला भारतीय वेळेनुसार रात्री २ वाजून २० मिनिटांनी जॅक डोर्सी यांनी हे ट्विट केले.

जॅक डोर्सी यांनी या सर्वात पहिल्या ट्विटला क्रिप्टोकरन्सीच्या रूपात विकण्याची घोषणा केली होती. या ट्विटला विकत घेण्यासाठीही कोटींच्या घरात बोली लागली. गेल्यावर्षी मार्चमध्येच हे ट्विट १७.३७ कोटींना विकण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार जॅक डोर्सी यांनी ही रक्कम आफ्रिकेतील रिस्पॉन्स नामक एका कंपनीला बिटकॉइनच्या रूपात दान केली आहे. तसेच, जॅक डोर्सी यांच्या या ट्विटला एनएफटीचाही दर्जा मिळाला आहे.
Share