राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर सोमवारी निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय सोमवारी (२ मे) निर्णय देणार आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्य सात दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे.

गुरुवारी राणा दाम्पत्याने घरचे जेवण मिळण्यासाठी केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणा दाम्पत्याला आज दुसरा झटका बसला. आज शनिवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवल्याने राणा दाम्पत्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. आता न्यायालय सोमवारी कोणता निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राणा दाम्पत्याला सोडू नका, नाही तर पुन्हा तोच धिंगाणा : सरकारी वकिलांचे म्हणणे  
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर न्यायालयात आज (३० एप्रिल) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी जोरदार विरोध केला. जर राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आले तर पुन्हा तोच तमाशा होईल, राडा होईल. ही सुनावणी फक्त जामिनाची नसून ते जर बाहेर आले तर परिस्थिती आणखी बिघडेल. राणा दाम्पत्यावर कलम १२४ (अ) का लावले हे जबाबात आधीच सांगितलं आहे. सरकारचे लोकशाहीवर नियंत्रण असणे गरजेचे असते. लोकशाहीमध्ये जसे सर्वांना सारखे अधिकार आहेत, तशा जबाबदाऱ्याही आहेत. लोकशाहीमध्ये नागरी हक्कांना मर्यादा आहेत. हे प्रकरण फक्त हनुमान चालिसा पठणाचे नाही. हनुमान चालिसा मुद्द्यावरुन राणा दाम्पत्याचा सरकारला अडचणीत आणण्याचा कट होता, असे अॅड. घरत यांनी न्यायालयाला सांगितले. आमदार रवी राणा यांच्या विरोधात १७ गुन्हे दाखल आहेत तर खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. दोघांनाही जामीन मिळाल्यास आणि ते बाहेर पडल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, असे सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले.

हा राजद्रोह होऊ शकत नाही -राणा दाम्पत्याच्या वकिलांचा दावा
हनुमान चालिसा पठण करणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. राणा दाम्पत्य ‘मातोश्री’वर गेले नाहीत, जी घटना घडलीच नाही त्यावर गुन्हा कसा नोंद होऊ शकतो, असा उलटसवाल राणा दाम्पत्याच्या वकिलांनी केला. फक्त राणा दाम्पत्यच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठण करणार होते. बाकी कुणीच कार्यकर्ते ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा पठणासाठी जाणार नव्हते. गडबड, गोंधळ, हिंसा टाळण्यासाठी राणांनी कार्यकर्त्यांना न येण्याचे आवाहन केले होते. राणा दाम्पत्यावर कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप होतोय; पण त्यांनी नाही तर सेनेच्या कार्यकर्त्यांनीच कायदा सुव्यवस्था बिघडवली. राणांनी सरकारविरोधात कुठेही हिंसेचे आवाहन केले नाही. लंडन ब्रीजवर हनुमान चालिसा पठण केले जाते, मग ‘मातोश्री’बाहेर केले तर बिघडले कुठे, तो गुन्हा कसा? राणा दाम्पत्य दुसऱ्या कोणत्याही धार्मिक स्थळावर हनुमान चालिसा पठण करणार नव्हते. राणा दाम्पत्याने घटनेच्या दिवशी दुपारीच हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम रद्द केला. केवळ १४९ च्या नोटिसीचे पालन न केल्याने राजद्रोहाचे कलम कसे लागू शकते? असा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्या वकिलांनी केला.

Share