“उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका”,चन्नी यांचे वक्तव्य 

पंजाब- पंजाब विधान सभेच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला आहे. २० फेब्रुवारीला मतदान होणार असून प्रत्येक पक्ष या ठिकाणी आपला कस लावू पाहत आहेत . या निमित्ताने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतात. उत्तर प्रदेश, बिहारमधील भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका असं चन्नी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रियंका गांधी त्यांच्या बाजूला उभ्या होत्या. या वक्तव्यावर त्यांनीदेखील हसत टाळ्या वाजवल्या आहेत.

चन्नी यांच्या वक्तव्यावर भाजपाने टीका केली असून त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात जिथे काँग्रेस निवडणूक लढवत आहे तेथील लोकांचा प्रियंका गांधींनी अपमान केल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. “हे खूप लाजीरवाणं आहे. आम्ही कोणत्याही व्यक्ती आणि समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. प्रियंका गांधीही उत्तर प्रदेशच्या आहेत त्यामुळे त्यादेखील भैय्या आहेत,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

प्रियंका गांधी काय म्हणाल्या-

प्रियंका गांधी पंजाबमधील रोपरमध्ये रॅलीत सहभागी झाल्या होत्या. संबोधित करताना त्या म्हणाल्या की , त्यांचे सासरे पंजाबमध्ये आहेत आणि त्यांना अभिमान आहे, की त्यांच्या मुलांमध्ये पंजाबचे रक्त आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनीही प्रियांका गांधी या पंजाबच्या सून  आणि पंजाबी महिला असल्याचे अभिमानाने सांगितले आहे .यावेळी  प्रियांका गांधी यांनी भाजप आणि आपवर जोरदार हल्लाबोल केला.

प्रियंका म्हणाल्या की, भाजप आणि आपचे नेते सारखेच आहेत. पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांनी आरएसएसपासूनच सुरुवात केली. त्यापैकी एकाने १५ लाख तर दुसऱ्याने ७ लाख देण्याचे आश्वासन दिले होते . पुढे त्या म्हणाल्या की,  पंतप्रधान गुजरात मॉडेलबद्दल बोलत असतात आणि अरविंद केजरीवाल दिल्ली मॉडेल बद्दल बोलत आहेत. परंतू प्रत्यक्षात असं काहीच नाही. तेथे ना कोणाला रोजगार आहे ना कोणाला व्यवसायात नफा आहे. त्यामुळे प्रचारा दरम्यान पगडी परिधान करून सरदार कोणी बनत नाही, त्यामुळे मी पंजाबच्या जनतेला आवाहन करते की , वेळीच खरे सरदार ओळखून त्यांना निवडून द्या .

Share