विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षांचा वेळ वाढणार

मुंबई : राज्यातील विद्यापीठातील ऑफलाईन पदवी परीक्षांच्या वेळा वाढवण्यात येणार आहेत. ऑफलाईन परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रतितास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या निर्णयामुळे सर्वच विद्यापीठातील परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. युवासेनेनेही अशी मागणी केली होती.

दरम्यान, आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. तसेच यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला होता. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. हि मागणी विचारात घेऊन ऑफलाईन परीक्षांसाठी प्रतितास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत दिली आहे. ऑफलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना या वाढवून मिळालेल्या वेळेचा नक्कीच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

Share