मुंबई : ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली आहे. तसेच बँकेतील साडेसात कोटी रुपयेही ईडीने जप्त केले आहेत. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत पर्ल ग्रुपच्या विरोधात ही कारवाई केली आहे.
पर्ल ग्रुपच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमधील साडेपाच कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा हा गुंतवणूक घोटाळा आहे. या घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर यासह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकून चौकशी केली आहे. या प्रकरणात गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात कमलजीत सिंग याच्यासह चंद्रभूषण ढिल्लो, प्रेम सेठ, मनमोहन कमल महाजन, मोहनलाल सहजपाल आणि कंवलजीत सिंग यांचा समावेश होता. मुख्य आरोपींना मदत केल्याचा या सर्वांवर आरोप आहे.
त्याअगोदर सीबीआयने ८ जानेवारी २०१६ रोजी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पर्ल गोल्डन फॉरेस्ट लिमिटेडचा सीएमडी व पर्ल ऑस्ट्रेलिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा माजी अध्यक्ष निर्मलसिंह भंगू तसेच पर्ल अॅग्रोटेक कॉर्पोरेशनचा एमडी व प्रमोटर सुखदेव सिंग, कंपनीचा कार्यकारी संचालक गुरमीत सिंग, सुब्रत भट्टाचार्य यांना अटक केली होती.
पर्ल ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. त्या तपासात जी माहिती आणि कागदपत्र पुढे येत आहे त्याच्या आधारे या ग्रुपच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. यानुसार ईडीने पर्ल ग्रुपची वसई पट्ट्यातील ७५ एकरची जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत जवळपास १८७ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तसेच याचसंदर्भातील बँक खात्यातून साडेसात कोटींची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.