रणजितंसिह डिसले यांच्यावर शिक्षण विभागाची कारवाई

सोलापूर-  जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितंसिह डिसले यांनी अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

डिसले यांना अमेरिकेत जाऊन पीएच. डी करण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या २१ डिसेंबर रोजी रजेचा अर्ज केला होता. डिसले यांनी यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन रजेबाबतची अडचण सांगितली. त्यावर स्वामी यांनी डिसले यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार डिसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन रजेची परवानगी मागितली. तेव्हा  रजेचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी तुम्ही अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेल्यावर शाळेचे काय करणार, असा सवाल केला. तुमच्या या उपक्रमामुळे येथील अध्यापनाच्या मूळ कामाचे काय, अशी विचारणा करत एवढी प्रदीर्घ रजा शक्य नाही. त्यामुळे यासाठी तुम्हीच पर्याय सुचवा,असे  शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हंटले होते .

शिक्षण प्रशिक्षण विभागात विशेष शिक्षक म्हणून ते सेवेत होते, असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ते गैरहजर असल्याचे आढळून आले आहे.तसा अहवाल देखील प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे गैरहजर राहणे गंभीर आहेच, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान करणेही  गुन्हा आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी सांगितल आहे.

परितेवाडी शाळेसाठी काय केले?

गेल्या तीन वर्षांत डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी आणि स्वत:च्या परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले, हे पडताळून पाहण्यासाठी त्यांच्या सेवेची फाइल सादर करण्यास शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. परंतु त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाचा परितेवाडी जिल्हा परिषद शाळेला किती उपयोग झाला, हे तपासावे लागेल, असे डॉ. लोहार यांनी सांगितले.

 

Share