“महाराष्ट्राची जनता जिंकली”; अभिनेता आरोह वेलणकरचे ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिनेता आरोह वेलणकर याने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर “महाराष्ट्राची जनता जिंकली” असे ट्विट केले. आरोहच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेली सलग दहा दिवस सुरू असलेल्या राज्यातील राजकीय नाट्याचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला आहे. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अभिनेता आरोह वेलणकर हा अनेक घडामोडींवर ट्विटरद्वारे सतत प्रतिक्रिया देत होता. आता बुधवारी रात्री सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आरोह वेलणकरने एक ट्विट केले आहे. “महाराष्ट्राची जनता जिंकली” असे ट्विट आरोहने केले आहे. आरोहने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्याला कमेंट्सच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी त्याला ट्रोलदेखील केले आहे. हे ट्विट केल्यानंतर आरोहने आणखी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर केला आहे.

जुन्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर करत आरोह वेलणकरने म्हटले आहे की, “जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं.” आरोहचे हे ट्विट पाहून एका युजरने म्हटले की, “साहेबांनी स्वतःच्या जीवावर फोडले होते आमदार. ईडी, सीबीआय मागे लावून फडणवीसांसारखं केलं नव्हतं.” आरोहच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

१९७८ साली राज्यात वसंतदादा पाटील यांचे सरकार असताना शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून एक पुरोगामी लोकशाही दल स्थापन केले आणि राज्यात सत्ता काबीज केली होती. १९७८ साली फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस (एस) ने ६९ तर काँग्रेस (इंदिरा) ने ६५ जागा जिंकल्या होत्या. ९९ जागांवर विजय मिळवत जनता पक्षाने बाजी मारली होती. काँग्रेस (एस) आणि काँग्रेस (इंदिरा) ने एकत्र येत राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन केले होते. त्यामुळे बहुमत असतानाही जनता पक्षाला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. काँग्रेस (एस) चे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री तर काँग्रेस (इंदिरा) चे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले होते. शरद पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. मात्र, दोन्ही काँग्रेसमधील विसंवादामुळे सत्ताधारी गोटातील चार मंत्री आणि ३८ आमदारांनी बंड पुकारत सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. शरद पवार यांनी असंतुष्ट आमदारांची मोट बांधून ‘पुलोद सरकार’ स्थापन केले होते. शरद पवारांचे हे बंड त्यावेळी खूपच गाजले होते. आरोह वेलणकरने आता या बंडाची आठवण करून देत केलेले हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.

आरोह वेलणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. याआधी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाही आरोहने सोशल मीडियाद्वारे याबाबत आपले मत व्यक्त केले होटे. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग, एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केलं आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे, ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळं आहे. त्यामुळं त्यांनीही शिवसेनेला भरभरून दिलंय, असे आरोह वेलणकर एका मुलाखतीमध्ये म्हणाला होता.

Share