अखेर इलॉन मस्क बनले ‘ट्विटर’ चे मालक

न्यूयॉर्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असणारे टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ ही जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी विकत घेतली आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्सला संपूर्ण ट्विटर कंपनी विकत घेतली असून, ‘ट्विटर’मधील १०० टक्के भागीदारी मस्क यांनी खरेदी केली आहे.

सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट असणारे ‘ट्विटर’ अखेर टेस्लाचे सीईओ इलाॅन मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. इलाॅन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्सला व्यवहार झाला. मस्क यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डाॅलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतला आहे. ट्विटर इंकनेही मस्क यांची ही ऑफर स्वीकारली असून, अधिकृत घोषणादेखील केली आहे. ‘ट्विटर’ आणि इलॉन मस्क यांच्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. ‘ट्विटर’मध्ये ९ टक्के भागीदार असलेल्या इलॉन मस्क यांनी ४३ अब्ज डॉलर्स किंमतीला ‘ट्विटर’ खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून बराच वादही झाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘ट्विटर’ने त्यांच्या या प्रस्तावाबद्दल विचार केला आणि अखेर ४४ अब्ज डॉलर्स किमतीला ‘ट्विटर’ कंपनी इलॉन मस्क यांच्या मालकीची झाली.

इलॉन मस्क काय म्हणाले..?

‘ट्विटर’ खरेदी केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये इलॉन मस्क म्हणाले, लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे; पण ‘ट्विटर’ या तत्त्वांचे पालन करते की नाही, याबद्दल खात्री नाही.  ‘ट्विटर’मध्ये मोठी क्षमता आहे. मी या कंपनीसोबत काम करून युजर्सच्या समुदायाला याची क्षमता पूर्णपणे वापरता येईल याची खबरदारी घेईन. माझे सर्वांत कट्टर विरोधकदेखील ‘ट्विटर’वर राहतील. कारण, मुक्त संवादाचा अर्थच तो आहे. मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ‘ट्विटर’ हे असे डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम करु शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात, असे मस्त यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/elonmusk/status/1518677066325053441?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1518677066325053441%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fglobal%2Felon-musk-bought-twitter-for-44-billion-dollars-vsk98

“मला ‘ट्विटर’मध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारे  माध्यम करायचे आहे, स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच काम डोक्यात आहेत. ‘ट्विटर’मध्ये फार क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारे उघडली जाणार आहेत,” असे म्हणत मस्क यांनी भविष्यातील बदलांचे संकेत दिले आहेत.

हा अनिश्चिततेचा काळ -पराग अग्रवाल
इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी केल्यामुळे ‘ट्विटर’ ही आता एक खासगी कंपनी असेल, ज्याचे एकमेव मालक इलॉन मस्क हे असतील. मात्र, त्यामुळे आता ‘ट्विटर’च्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. ‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी ‘ट्विटर’च्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खरेदी केल्यानंतर कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना पराग अग्रवाल यांनी सांगितले की, लोकांना कामावरून काढायचे की नाही हे अद्याप नियोजित नाही; परंतु जेव्हा हा सगळा व्यवहार पूर्ण होईल, त्यावेळी काय होईल याबद्दल कोणतेही भाष्य करू शकत नाही. कंपनी आता मस्क यांच्या हातात आहेत. आपल्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. हा अनिश्चिततेचा काळ आहे.

पराग अग्रवाल यांना हटवल्‍यास ३.२ अब्‍ज रुपये मोजावे लागणार


‘ट्विटर’ कंपनी मालकीची झाल्‍यानंतर इलॉन मस्‍क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांना १२ महिन्‍यांच्‍या आत हटविले तर त्‍यांना तब्‍बल ४२ मिलियन डॉलर म्‍हणजे ३.२ अब्‍ज रुपये मोजावे लागणार आहेत. अग्रवाल यांना १२ महिन्‍यांच्‍या आत पद सोडण्‍यास सांगितले तर ‘ट्विटर इंक’ कंपनीला त्‍यांना ३.२ अब्‍ज रुपये द्‍यावे लागणार आहेत, असे रिसर्च फर्म इक्‍विलरच्‍या अहवालात म्‍हटले आहे. पराग अग्रवाल हे कंपनीचे पहिले मुख्‍य टेक्‍नोलॉजी अधिकारी होते. यानंतर नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये त्‍यांची ‘ट्विटर’च्‍या सीईओपदी नियुक्‍ती झाली होती. त्‍यांना मागील वर्षी ३०.४ मिलियन डॉलर एवढे वेतन मिळाले. मात्र, यासंदर्भात कंपनीने अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘ट्विटर’ कंपनी विकत घेतल्‍याचे मस्‍क यांनीच सोमवारी रात्री जाहीर केले होते. मात्र १४ एप्रिल रोजी कंपनीच्‍या बैठकीस सहभागी होण्‍यास त्‍यांनी नकार दिला होता. कंपनीच्‍या व्‍यवस्‍थापनावर माझा विश्‍वास नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले होते. त्‍यामुळे आता असे मानले जात आहे की, मस्‍क व्‍यवस्‍थापनातील महत्त्‍वाची व मुख्‍य पदावरील अधिकार्‍यांना हटवतील. मात्र, यासाठी त्‍यांना भरपाई म्‍हणून माेठी किंमत माेजावी लागणार आहे.

Share